भुजबळांची शिक्षण संस्था पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

bhujbal
मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई एज्युकेशन ट्रस्ट , एम आय टी पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण विरोधी मंचाने फी घेऊनही विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप संस्थेवर केला असून तशी तक्रारही दाखल केली गेली आहे. वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार असल्याचे मंचाचे पदाधिकारी सांगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांची फी एकदम भरण्याचे आदेश संस्थेने दिले आहेत. या संस्थेने गतवर्षी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी गटातील ४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असे सांगून प्रवेश दिले.त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही विद्यार्थ्यांनी संस्थेकडे जमा केली आहेत. गतवर्षी फी घेतली गेली नाही मात्र यंदाच्या वर्षात गतवर्षासह या वर्षाची अशी दोन्ही वर्षांची फी भरण्यास सांगितले गेले आहे. वर्ष सुरू होऊन दोन महिने लोटले तरी या विद्यार्थ्यांना फी भरल्याशिवाय प्रवेश दिला गेलेला नाही. यामुळे हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या विरोधात गरज भासल्यास न्यायालयात जाणार असल्याचे मंचाने जाहीर केले आहे.

Leave a Comment