सरकारी बँकेत चक्क लाचखोरी

syndicate
सिंडिकेट बँकेच्या चेअरमनला लाचेच्या प्रकरणात अटक होणे ही मोठीच धक्कादायक घटना आहे. हे चेअरमन लाच खातात याचा सुगावा लागल्यापासून सीबीआयने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते स्वत: लाच घेत नसत पण आपल्या नातेवाइकांना त्यात गुंतवत असत. त्यांनी आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी चेअरमन सुधीर कुमार जैन यांच्या वतिने लाच स्वीकारणारी यंत्रणाच निर्माण केली होती. या सार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेतील काही भ्रष्ट अधिकार्‍यांना शिक्षा झालेल्या आहेत. गेल्याचवर्षी इंडियन बँक या बँकेचे माजी चेअरमन एम. गोपालकृष्णन यांना चक्क शिक्षा ठोठावली गेली आहे. त्यांच्या भ्रष्ट व्यवहारामुळे त्यांच्या बँकेला ३ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्या तोट्यास त्यांना कारणीभूत ठरवून एक वर्षाची सक्तमजुरी आणि दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परंतु सिंडीकेट बँकेच्या चेअरमनलाच अटक झाली आहे. बँकिंग क्षेत्रातली ही मोठी धक्कादायक बाब आहे.

एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या चेअरमनला लाच घेतल्याबद्दल त्याच्या ऑफिसमध्ये अटक व्हावी ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. हे चेअरमन सुधीरकुमार जैन यांना ५० लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुधीरकुमार जैन हे बंगळुरूमध्ये राहतात. कारण त्यांच्या बँकेचे मुख्यालय बंगळुरमध्ये आहे. त्यांच्यावतीने त्यांच्या दोघा नातेवाईकांनी दोन कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या मध्यस्थांकडून लाच घेतली आणि ती घेताच त्यांना जेरबंद करण्यात आले. हे दोघे म्हणजे पुनीत गोधा आणि विनित गोधा हे त्यांचे मेव्हणे आहेत. त्यातील विनित गोधा हा भोपाळमधला नामवंत वकील असून मध्य प्रदेश कॉंग्रेसचा प्रवक्ता आहे. तो आपल्या मेव्हण्याच्यावतीने भोपाळमध्ये बसून असे अवैध पैसे गोळा करत होता. अशा क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या हवाला रॅकेटियर विजय पहुजा याच्याकडून त्याने पैसे घेतले. तेव्हा त्या ३३ लाख रुपयांसह त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता सुधीरकुमार जैन यांचे नाव निष्पन्न झाले. तिच्या अनुरोधाने सीबीआयच्या अधिकार्‍यांनी बंगळुरमध्ये धाडी टाकून जैन यांना अटक केली. अशा प्रकरणात एखाद्याला अटक झाली की त्याच्या घरावर धाडी पडतात आणि घरामध्ये साठवलेली बेकायदा तसेच उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांशी विसंगत अशी संपत्ती हस्तगत केली जाते. त्याच पध्दतीने सुधीरकुमार जैन यांच्या घरावर टाकलेल्या धाडींमध्ये १ कोटी रुपयांच्या ठेवींच्या पावत्या आणि २१ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

अशा प्रकारची अवाजवी संपत्ती एरवी घरात साठवलेली असते. परंतु जोपर्यंत एखाद्या प्रकरणात असे लोक सापडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरातली ही संपत्ती तशीच सहीसलामत राहिलेली असते. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात अनेक शासकीय अधिकार्‍यांना पकडण्यात आले. त्यातल्या एका अभियंत्याला तर अगदी काही हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पण नंतर त्याच्या घरावर धाडी पडल्या तेव्हा करोडोंची संपत्ती उघड झाली. ती हजार रुपयांची लाच घेताना सावधपणा केला नाही म्हणून हे सगळे घडले. माणसाने हाव तरी किती करावी. परंतु असे हावरट लोक कुठे ना कुठे सापडतातच. अशी अनेक उदाहरणे आहेत. गतवर्षी याच भोपाळ शहरात एका जिल्हाधिकार्‍याला अटक केली होती. नंतर त्याच्या घरावर धाडी टाकल्या तेव्हा जवळपास १ हजार कोटी रुपयांची मालमत्ता, सोने, हिरे, ठेवपावत्या, बंगले, रिकाम्या जागा आणि शेतजमिनी उघड्या झाल्या. त्याला ज्या प्रकरणात पकडले ते प्रकरण घडले नसते तर ही सारी संपत्ती कधीच उघड झाली नसती.

सुधीरकुमार जैन हे काही उद्योगसमूहांना गैरवाजवी सवलती देतात आणि त्यापोटी पैसे खातात असा संशय आलेला होता आणि त्यावरून सहा महिन्यापासून त्यांच्यावर सीबीआयने पाळत ठेवलेली होती. त्यांचे फोन टॅप केले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. त्यांच्या अटकेपूर्वी त्यांच्या भोपाळमधल्या दोघा नातेवाईकांना अटक करण्यात आली होतीच परंतु त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या नंतर ९ जणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये भूषण स्टील या कंपनीचा उपाध्यक्ष तसेच प्रकाश इंडस्ट्रीजचा एक संचालक यांचाही समावेश आहे. एकंदरीत सुधीरकुमार जैन यांच्या अटकेने सिंडीकेट बँकेच्या संबंधात असलेल्या एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या संबंधात काही चौकशी केली असता असेही आढळले आहे की सिंडीकेट बँकेतून भूषण स्टील आणि प्रकाश इंडस्ट्रीज या दोन उद्योगांशिवाय इतरही काही उद्योगांना असेच अवाजवी लाभ दिले गेले होते. त्यामध्ये पुरेसे आर्थिक बळ नसताना कॅश क्रेडिट वाढवून देण्याचेही प्रकार घडलेले आहेत. त्यांची अधिक चौकशी सुरू आहेच. पण सिंडीकेट बँकेप्रमाणेच इतरही काही सरकारी बँकातून अशा प्रकारच्या गैरवाजवी सवलती दिल्या जातात की काय यावरही शोधकार्य जारी आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या अंमलबजावणीनंतर अशा प्रकरणांना मोठा वाव निर्माण झाला आहे. बँकांतही ठेवी जास्त झाल्या आहेत आणि पैसा हाताळताना नीतीमत्ता सांभाळण्याबाबत जाणीव राहिलेली नाही.

Leave a Comment