राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भव्य सांगता सोहळा

glasgow
ग्लासगो – २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा मागील अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या कार्यक्रमाचा भव्य रंगारंग सोहळयाने समारोप झाला. या स्पर्धेच्या उदघाटन सोहळयाप्रमाणे सांगता समारंभ देखील भव्य अशा स्वरूपाचा होता.

या समारंभाने हॅम्पडेन पार्कवर उपस्थितांना अक्षरक्ष ठेका धरायला लावला. या सांगता समारंभाला ४५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. आयोजकांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन सांगता समारंभाच्या कार्यक्रमातूनही जगाला घडवले. स्कॉटिश गायिका लुलूने आपल्या गाण्यांनी या कार्यक्रमात रंग भरले. मागच्या अकरा दिवसात विविध देशांच्या क्रीडापटूंनी २६१ स्पर्धांमधुन ८२४ पदके पटकावली. २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण नऊ विश्वविक्रम रचले गेले.

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेचे राष्ट्रकुलच्या परंपरेनुसार आयोजक असणा-या ऑस्ट्रेलियाच्या हाती स्पर्धेची बॅटन सोपवण्यात आली. यावेळी राष्ट्रकुलच्या सर्व सदस्य देशांना ऑस्ट्रेलियाला येण्याचे निमंत्रण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा फटाक्यांच्या आतषबाजीने ग्लासगोचा आसमंत उजळून निघाला. हे क्षण संपूच नयेत असे येथे उपस्थित असणा-या प्रत्येकाला वाटत होते.

Leave a Comment