मुलांना मारहाण, शिवीगाळ केल्यास ५ वर्षे तुरूंगवास

child
दिल्ली – लहान मुलांना शिवीगाळ, मारहाण केल्यास तसेच महाविद्यालयात रॅगिंग केल्यास आता अनुक्रमे पाच व तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा लवकरच आणला जाणार आहे असे समजते. लहान मुलांबाबत होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार कडक कायदे करत असून त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुवेनाईल जस्टीस अॅक्ट २००० च्या जागी हा नवा कायदा आणला जाणार असून ज्युवेनाईल जस्टीस बिल २०१४ संसदेत सादर केला जाणार आहे. नवा कायदा तयार करताना सरकारने मुलांचे हक्क, अधिकार व आंतरराष्ट्रीय कायदा लक्षात घेतले गेले असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.

नव्या कायद्याचा आराखडा तयार झाला आहे आणि कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर तो दोन्ही सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. हा कायदा आला तर मुलांना शारिरीक व मानसिक इजा करण्यास निर्बंध व दोषींना शिक्षा अशी तरतूद असलेल्या ४० देशांत भारताचा समावेश होणार आहे. मुलांना मारहाण अथवा शिवीगाळ ही शारिरीक इजाच धरली जाणार आहे. हा गुन्हा प्रथमच करणार्‍याला ६ महिने कैद व दंडाची तरतूद असून दुसर्‍यादा असाच प्रकार करणार्‍याला ३ वर्षे कैद व ५० हजार रूपये दंड होणार असून ही शिक्षा ५ वर्षे कैद आणि १ लाख रूपये दंडापर्यंत वाढविता येणार आहे.

महाविद्यालयात रॅगिंग मुळे कुणाला शारिरीक मानसिक इजा पोहोचली तर संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनालाही दोषी धरले जाणार आहे तसेच रॅगिंग करणार्‍याना ३ वर्षांची कैद होऊ शकणार आहे. मुलांची खरेदी विक्री, सामान विक्रीसाठी मुलांचा वापर, अमली पदार्थ ने आण तसेच दहशतवादी कारवायांसाठी मुलांचा वापर केला गेल्यास ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment