आता माळीणवासियांना चिंता पुनर्वसनाची

malin
पुणे – मागच्या बुधवारी माळीणवासियांवर निसर्गाचा कोप झाला असला तरी अद्याप येथील स्थिती भकासच आहे. माळीणच्या ढिगाऱ्याखालून आज सकाळपर्यंत 106 मृतदेह हाती लागले असून यात 38 पुरुष, 43 महिला तर, 12 मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 84 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर अजूनही 50-55 मृतदेह ढिगा-याखालीच आहेत. पावसाचा अधून-मधून खेळ सुरुच असला तरी बचावकार्य जोमाने सुरु आहे. दरम्यान, उर्वरित ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढिगा-याखाली कोणी जिवंत सापडण्याची शक्यता नाही.

प्रशासनाला आता या गावातील नागरिकांचे पुनवर्सन कसे करायचे हा प्रश्न पडला आहे. परिसरात सततच्या पावसामुळे घाणीचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी परसली आहे. प्राथमिक उपचार म्हणून येथील नागरिकांना संसर्गजन्य रोगांची लागण होऊ नये म्हणून टीटीचे इंजेक्शन व इतर औषधे देण्यात येत आहेत.

या घटनेत बचावलेल्या गावक-यांना प्रशासनाने इतरत्र हलविले असले तरीही गाव सोडण्यास काही गावकरी तयार नाहीत. या सर्व गावक-यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन कोठे व कसे करायचे याबाबत प्रशासन चिंताग्रस्त आहे. गावकरीही अद्यापही या घटनेने भेदरलेले आहेत. ते काहीही बोलण्याच्या व मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. एकूनच पुढील चार-पाच दिवस म्हणजेच ढिगारा उपसण्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही व पाऊसही थांबत नाही तोपर्यंत प्रशासन वेगाने चक्रे फिरवू शकत नाही. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस आणखी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment