माळीण दुर्घटना ; ‘नासा’चा इशारा पण हवामान खात्याचे दुर्लक्ष

malin
नवी दिल्ली – पुणे जिल्ह्यात भीमाशंकरच्या प्रदेशात, उत्तरी पश्चिम घाटापासून थेट गुजरातपर्यंत अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या भीषण घटना घडू शकतात, असा इशारा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या ‘नासा’ने माळीण दुर्घटनेच्या एक दिवस आधीच दिला होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मात्र त्याकडे हवामान खात्याने दुर्लक्ष केले नसते तर माळीणमध्ये आज ही स्थिती ओढवली नसती.

गेल्या बुधवारी, ३० जुलैला माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ४४ घरं आणि शेकडो गावकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८८ वर पोहोचलाय आणि तो आणखी वाढण्याची भीती आहे. निसर्गाच्या या प्रकोपाबद्दल सगळीकडेच दुःख आणि हळहळ व्यक्त होत असताना, भारतीय हवामान खात्याच्या दुर्लक्षामुळेच ही भीषण दुर्घटना घडल्याचे खेदजनक आणि खळबळजनक पुरावा माध्यमांच्या हाती लागला आहे. २९ जुलैला संध्याकाळी सहाच्या सुमारास ‘नासा’ने आपल्या वेबसाइटवरून धोक्याची घंटा वाजवली होती, पण ती हवामान खात्याने ऐकली नाही

‘नासा’च्या वेबसाइटवर २९ तारखेला माळीण गावासह भीमाशंकरचा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगात दाखवण्यात आला होता. म्हणजेच, तिथे १७५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. इतकंच नव्हे तर, भीमाशंकरसह गुजरातपर्यंतच्या संपूर्ण सह्याद्री परिसरात भूस्खलनाची भीती असल्याचे ही त्यांनी नमूद केले होते . हा अॅलर्ट पाहून, धोकादायक प्रदेशातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. परंतु, आपल्या हवामान खात्याने हा इशारा गांभीर्याने घेतलाच नाही. त्यामुळेच आज माळीण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment