
नांदेड – माजी खासदार आणि अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर आल्या असून कोणाकडे जायचे याचा निर्णय अजून घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशोक चव्हाणांना विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा मोठा राजकीय धक्का असल्याची चर्चा आहे.
भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
पदाच्या लालसेने दुसर्या पक्षात जात नसून चव्हाणांची कार्यपद्धती चुकीची असल्यामुळे आपण काँग्रेस सोडत असल्याचे स्पष्ट करून खतगावकर पुढे म्हणाले, चव्हाण यांना कार्यकर्त्यांचा मान-सन्मान करता येत नाही. त्यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी सोडली. प्रचारात सहभागी झालो; पण त्यांनी कधी सन्मानाची वागणूक दिली नाही. साधे पत्रिकेत नाव टाकण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही. दु:खद अंत:करणाने व निराशेने मी हा निर्णय घेतला आहे.
