भारत अ संघ चौरंगी वनडे मालिकेचा विजेता

cricket
मरारा ओव्हल – भारत अ संघाने येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचा चार गडय़ांनी पराभव करत चौरंगी वनडे मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलिया अ ने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 274 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ ने 48.4 षटकात 6 बाद 275 धावा जमवित स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

कर्णधार क्रेग व्हाईटने ऑस्ट्रेलिया अ च्या डावात शानदार शतक झळकविताना हय़ुजेससमवेत सलामीच्या गडय़ासाठी 146 धावांची भागीदारी केली. हय़ुजेसने 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. व्हाईटने 150 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारासह 137 धावा झोडपल्या. डुलेनने 3 चौकारांसह 24 तर कटींगने 21 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह नाबाद 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ च्या डावात 7 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. भारत अ संघातील धवल कुलकर्णीने 51 धावात 3 तर मोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारत अ प्रत्युत्तरादाखल खेळताना डावाला चांगली सुरुवात झाली नाही. कर्णधार उथप्पा, व्होरा आणि अंबाती रायडू हे पहिले तीन फलंदाज 51 धावात तंबूत परतले. त्यानंतर मनोज तिवारी आणि केदार जाधव यांनी चौथ्या गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. तिवारीने 3 चौकारांसह 50 तर जाधवने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 73 चेंडूत 78 धावा केल्या. या मालिकेत फलंदाजीत सातत्य दाखविणारा सॅमसन 5 धावावर धावचित झाला. ऋषी धवन आणि अक्षर पटेल या जोडीने सातव्या गडय़ासाठी 12.3 षटकात अभेद्य 93 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला 8 चेंडू बाकी असताना चार गडय़ांनी शानदार विजय मिळवून दिला. धवनने 55 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 56 तर पटेलने 38 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 45 धावा जमविल्या. भारत अ च्या डावात 3 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलिया अ तर्फे कटींगने 46 धावात 3 तर रिचडर्सनने एक गडी बाद केला. विदेशी दौऱयावर भारत अ संघाने हे सलग सहावे विजेतेपद मिळविले आहे.

Leave a Comment