सावित्रीबाई फुले स्मारक प्रकल्पासाठी ५ कोटींचा निधी देणार;मुख्यमंत्री

cm1
पुणे:अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवावर उदार होऊन समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे फार मोठे धाडस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले आहे, असे गौरव उदगार काढून सावित्रीबाई फुले स्मारकाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फुले यांच्या स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.

पुणे शहरातील महात्मा फुले यांच्या वाड्याशेजारीच बांधण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून स्मारकातील प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यासाठी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, यासाठी महापालिकेने त्वरित कामाचा आराखडा तयार करून पाठवावा. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांची स्मारके जोडली जावीत, असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगून या स्मारकामुळे नव्या पिढीला प्रेरणा व दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फुले कुटुंबियांचे शिक्षणातील महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊनच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बऱ्याच वर्षापासून रखडलेले काम पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांनी महापालिका व शासनास आपल्या भाषणात धन्यवाद देऊन फुले यांचे आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते या कुटुंबीयांनी समाजाला आधुनिकतेचा संदेश व दृष्टी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, अंधश्रद्धेविरुद्ध समाजात जनजागृतीसाठी व स्त्री शिक्षणात पुढाकार, बाल विवाह प्रतीबंधाबाबत समाजामध्ये चळवळ उभी करून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. सावित्रीबाई या उत्तम लेखिका होत्या व त्यांचे फुले काव्य प्रसिद्ध आहे. शूद्रांना शिक्षण मिळाले पाहिजे व शुद्रावरचा डाग काढण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला, असे पवार यांनी नमूद करून सत्यशोधक समाजाचे नेतृत्वही त्यांनी केले त्या कर्तुत्व संपन्न होत्या असे पवार म्हणाले .