शिवसेनेने काढली कर्नाटक सरकारची अंत्ययात्रा

shivsena
बेळगाव – जे काही बोलायचंय ते महाराष्ट्रात जाऊन बोला, अशी दमदाटी करून कर्नाटक पोलिसांनी शिवसेना नेते दिवाकर रावते यांना कर्नाटक हद्दीतून बाहेर काढल्याने खवळलेल्या शिवसेनेने सीमाभागातील शिणोली गावात कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. शिवाय कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ही पुकारला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील येळ्ळूर गावात कन्नडिगांनी रविवारी अक्षरशः थैमान घालत मराठी भाषिकांना जबर मारहाण केली होती ,त्यातून महिलाच काय तान्हुले बाळही सुटले नव्हते. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’च्या फलकावरून पोलीस-गावकऱ्यांमध्ये चकमक उडाली होती आणि त्यावरून कन्नडिगांचा मराठीद्वेष उफाळून आला होता. त्यांनी मराठी माणसांना बेदम मारहाण केली होती. या अत्याचारग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते येळ्ळूरला निघाले होते. मात्र बेळगावमध्ये पंचमुखी हॉटेलजवळच कानडी पोलिसांनी त्यांना अडवित ‘तुम्हाला काय बोलायचे ,ते महाराष्ट्रात जाऊन बोला आणि इथून निघा ‘अशा शब्दात दरडावून मोगलाईचे दर्शन घडविले. कर्नाटक पोलिसांनी रावतेंसह आमदार सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्राच्या हद्दीत, शिणोली गावात आणून सोडले . तिथे शिवसेनेच्या संतापाचा उद्रेक झाला.मराठीजनांवर जुलूम करणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार शिवसेनेने केला. त्यांनी कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले .आणि कोल्हापूर बंदची हाकही सेनेनी दिली.

Leave a Comment