पुण्याच्या मेट्रोचे लवकरच भूमिपूजन ;मुख्यमंत्री

cm
पुणे : पुणे शहराच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता मिळाली असून, लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पुणे महानगर पालिकेच्यावतीने कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर सौ. चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, रमेश बागवे, विनायक निम्हण, पुणे म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी महापौर कमलताई व्यवहारे, महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची नवी दिशा दिली. नवीन व विकसित तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी युवकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देश तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना देऊन औद्योगिक विकासात पूरक असणारी परवाना पद्धत सुरु केली. त्यामुळे देशात आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळाली. या परिस्थितीचा महाराष्ट्राला विशेषत। पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांना लाभ मिळाला. गेल्या दहा वर्षात या शहरात विविध उद्योग सुरु झाले आहेत. शासन व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

पुणे शहराच्या विकासात मोलाची भर घालणार्‍या मेट्रो प्रकल्पास मान्यता मिळाली असून लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यांचा लाभ पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड या शहरालाही मिळेल, मुंबई, नवी मुंबई आणि नागपूर या ठिकाणीही औद्योगिक विकासाला आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राजीव गांधी यांच्या पुतळ्यामुळे युवकांना विकासाची प्रेरणा मिळेल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नवीन तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानामुळे जगात मोठे परिवर्तन होत आहे. माहितीचा स्फोट झाला आहे. याचे श्रेय राजीव गांधी यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन व धोरणाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राजीव गांधी पुतळा समितीचे अध्यक्ष गोपाल तिवारी, नगरसेवक अभिजित कदम यांची भाषणे झाली. महापौर सौ. चंचला कोद्रे यांनी प्रास्ताविक केले. राजीव गांधी यांच्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार हे असून त्यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला.

Leave a Comment