
मुंबई – बंडाचा झेंडा फडकावून कॉंग्रेसलाच घरचा आहेर देणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा बंडाची तयारी चालवली आहे,त्याला कारणही तसेच आहे, ज्यावेळी बंडाचे निशाण रोवले त्यावेळी अडचणीत सापडलेल्या कॉंग्रेसने त्यांची समजूत काढली पण त्यांना ठोस आश्वासन न दिल्याने राणे यांनी आता मंगळवारचा मुहूर्त शोधला असून कोणता पवित्रा घेणार हे ते स्पष्ट करणार आहेत.
नारायण राणे पुन्हा बंडाच्या पवित्र्यात ?
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणे यांनी पंधरा दिवसापूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बंडाचा झेंडा फडकवला होता. मात्र, अद्यापही राणेंना काँग्रेसकडून कोणतेच ठोस आश्वासन न मिळाल्याने यापुढील आपली भूमिका काय असणार हे राणे मंगळवारी स्पष्ट करणार आहेत.
नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राणेंचे समाधान झाले नाही. त्यानंतर राहुल गांधींनी राणेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन राहुल यांनी दिले नाही. याबातीत राहुल सोनिया गांधींशी चर्चा करणार होते. मात्र अजूनही कोणाताच प्रतिसाद न मिळाल्याने अस्वस्थ असलेले राणे मंगळवारी आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
