गफ्सा – दरड कोसळून म्हणा डोंगरकडा पडल्याने गावेच काय त्या भागातील जमिनींची रचनाच बदलून जाते. किंबहुना इथे गाव होते, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. अशीच स्थिती उलट घडली तर म्हणजे जिथे पाण्याचा मागमूसही नाही, अशा वाळवंटात जर तलाव अचानक अवतरला तर काय ? हो खरे आहे, आफ्रिकेतील ट्यूनिशिया देशामध्ये दुष्काळग्रस्त समजल्या भागात अचानक असा तलाव निर्माण झाला आहे. निसर्गाच्या या चमत्कारामुळे स्थानिकांसह शास्त्रज्ञांनीही तोंडात बोटे घातली आहेत.
वाळवंटात अचानक अवतरले तलाव !
गफ्सा शहरापासून ओमलारायस शहराकडे जाणा-या मार्गापासून २५ किलोमीटर अंतरावर तयार झालेला हा तलाव सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या तलावाच्या निर्मितीमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी, स्थानिक लोकांनी या तलावला ‘गाफ्सा’ बीच असे नाव ठेवले आहे. तिथे येणा-या पर्यटकांची संख्या वाढत असून प्रशासनाने मात्र सावधानतेचा इशारा दिला आहे.
निर्मितीनंतर काही दिवस या तलावाचे पाणी निळे आणि अगदी स्वच्छ होते. मात्र आता या पाण्याचा रंग गडद हिरवा झाल्याने या तलावाच्या रहस्यामध्ये आणखी भर पडली. पाण्याचा रंग बदलल्याने या तलावातील पाणी कार्सिनोजेनिक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या पाण्यामुळे त्वचेचा कॅन्सर होणाचा धोका असल्याची भिती व्यक्त होत आहे.