राज दोन मतदारसंघातून नशीब आजमावणार!

raj
मुंबई- एकीकडे शिवसेनेला ‘पाण्या’त पाहताना राज्यात नवे राजकीय समीकरणे उदयास आणण्याचा खटाटोप मनसेच्या अंगलट आल्याचे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे,इतकेच काय खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे निवडणूक लढविणार आहेत. सद्यस्थितीत राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे ,त्यात मुंबई आणि मराठवाडा येथून म्हणजेच दोन मतदारसंघातून राज ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आणि मनसेसह साऱ्याच पक्षांचे झालेले पानिपत लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी योजनाबद्ध प्रचार करण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पोहोचावा यासाठी निवडक जागा लढण्याची रणनीती राज यांनी आखली होती.त्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देताना मनसेने भाजपच्या विरोधात कमी जागा लढविल्या होत्याप;पण ती भूमिका मनसेच्या अंगलट आली, निवडून तर कोणी आलेच नाही मात्र मागील निवडणुकांच्या वेळी मिळालेली मते पाहता लोकसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण खालावल्याचे स्पष्ट झाले ,इतकेच काय मतांच्या टक्केवारीत बसपापेक्षा मनसेला कमी टक्केवारी मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविण्याकडे राज यांचा कल आहे. मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी व आमदारांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करून इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या असून त्याची छाननी करून उमेदवार निवडीचे काम सध्या मनसेत वेगाने सुरु आहे. उमेदवारांना लढण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी येत्या पंधरा दिवसात पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांना लढण्याचे संकेत दिले जातील असे सूत्रांचे म्हणणे आहे. मराठवाडय़ात मनसेचे पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात असून मनसेला या ठिकाणी चांगल्या जागा मिळतील असे मनसेच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे दुसरा मतदारसंघ म्हणून राज यांनी मराठवाडय़ातून निवडणूक लढल्यास त्याचा निश्चित फायदा मनसेच्या उमेदवारांना मिळेल अशी भूमिका यामागे आहे.

या दृष्टिकोनातून मराठवाडय़ातील दोन-तीन मतदारसंघांचा आढावाही घेण्यात आला असून त्या ठिकाणी पक्षबांधणीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. मनसेचा प्रचाराचा राज हेच एकखांबी तंबू असल्याचे लक्षात घेऊन काही आमदार व सरचिटणीसांवर प्रचाराचा भार सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज यांनी तयार केलेली विकासाची ब्लू प्रिंट जिल्ह्य़ाजिल्ह्य़ात मांडण्यात येणार असून लवकरच राज हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
राज यांच्या ब्लू प्रिंटमध्ये रस्त्यांसह पायाभूत सविधा, उद्योगांची वाढ आणि त्यातून बरोजगारांना मिळणारा रोजगार, शिक्षण, सिंचनासह पाणीपुरवठय़ाच्या योजना आणि शेतीधोरण त्याचप्रमाणे क्रिडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचावे याला विशेष महत्त्व देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment