मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अस्तित्वात आला ३६वा जिल्हा

palghar
पालघर- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे पालघर येथे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यातील पालघर हा ३६ वा जिल्हा ठरला आहे.

जिल्ह्याचे कार्यालय पालघर सत्र न्यायालयाजवळील विक्रीकर भवनाच्या नवीन इमारतीत सुरू करण्यात आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आठ तालुक्यांचा समावेश आहे. तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी व शहापूर हे सात तालुके आहेत.

पालघर जिल्ह्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुसळधार कोसळत असलेला पाऊस आणि रस्त्यावर होणा-या वाहतूक कोंडीवर मात करीत रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडला. वांद्रे- वापी शटल रेल्वेने ते पालघरला पोहचले.

ठाणे जिल्हा परिषदेसह यापूर्वीच्या सर्व १३ पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. नवीन निवडणुका होईपर्यंत येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार सहा महिने प्रशासक पाहणार आहे.

Leave a Comment