माळीणगावचे पुनर्वसन करणार राज्य सरकार – पतंगराव कदम

patangrao
पुणे – दुर्घटनाग्रस्त माळीण गावच्या पुनर्वसनात अनेक अडचणी येत असून राज्य सरकार बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पिडित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करेल. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी त्यासाठी पिडित कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून, त्यांना घरे बांधून देणे, संसारोपयोगी सर्व साहित्याचा पुरवठा राज्य सरकार करणार असल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने माळीण गाव डोंगराखाली गेले, अशी बातमी मिळाल्यानंतर तातडीने हालचाल सुरु केली आणि पोलिसांसह एनडीआरएफच्या 9 तुकडय़ा बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी पाठविल्या. माळीणमध्ये एकूण 174 घरे होती. पैकी 44 घरे ढिगाऱ्याखाली पुर्णपणे गाडली गेली आहेत. यात 167 लोक अडकल्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 63 मृतदेह बाहेर काढण्यात आली असून, अजून दोन दिवस काम पूर्ण होण्यास लागणार असल्याचे कदम यांनी सांगितले. 63 मृतांमध्ये 25 पुरुष, 26 महिला तर 10 बालकांचा समावेश आहे. एकूण 52 मृतदेहांचे विच्छेदन करुन सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर 3 मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आल्याचे पतंगराव म्हणाले. मदत कार्यात 50 रुग्णवाहिका आणि 15 जेसीबी मशीन्स कार्यरत आहेत. तसेच दुर्घटनास्थळी वोडाफोन आणि बीएसएनएलचे तात्पुरते नेटवर्क उभे करण्यात आले आहे.

Leave a Comment