भारताचे मुष्टियुद्धात पंचक निश्चित

boxer
ग्लासगो : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग, जागतिक क्रमवारीतील तिसरा मानांकित देवेंद्र सिंग, मनदीप जांगरा, लैश्राम सरिता देवी, पिंकी जांगरा आदी 5 मुष्टियोद्धय़ांनी किमान 5 पदके निश्चित केली असून विजेंदरने उपांत्य फेरीत धडक मारली तर अन्य मुष्टियोद्धय़ांनी देखील किमान कांस्यपदक मिळेल, यावर अधोरेखित केले.

उपांत्यपूर्व लढतीत त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या ऍरॉन प्रिन्सला 75 किलोग्रॅम वजनगटात विजेंदरने मात दिली. विजेंदरने प्रारंभीच 3-0 अशा भरभक्कम वर्चस्वासह विजयावर शिक्कामोर्तब केले. तिन्ही पंचांनी त्याला एकमताने विजयी घोषित केले. पहिल्या फेरीत विजेंदरने सावध पवित्र्यावर भर दिला तर त्या तुलनेत प्रिन्स अधिक आक्रमक होता. दुसऱया फेरीत मात्र विजेंदरच्या दे दणादण पंचेसमुळे प्रिन्स पूर्ण निरुत्तर झाला. तिसऱया फेरीतही त्याने सहज वर्चस्व सिद्ध केले.

लाईट 57-60 किलोग्रॅम व 51 किलोग्रॅम गटात अनुभवी लैश्राम सरिता देवी, युवा पिंकी जांगरा यांनी महिला गटात अनुक्रमे उपांत्य फेरी गाठली. स्कॉटलंडच्या अकिल अहमदचा जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी विराजमान असलेल्या देवेंद्र सिंगने धुव्वा उडवत पदकाच्या फेरीत धडक मारली. मणिपूरची 32 वर्षीय सरिता देवी हिने वेल्सच्या चार्लेन जोन्सविरुद्ध पिछाडी भरुन काढत 3-1 असा विजय संपादन केला. आता उपांत्य फेरीत तिची लढत मोझाम्बिक्यूच्या मारियाविरुद्ध लढत होईल.

राष्ट्रीय चाचणीत ऑलिम्पिक कांस्यजेत्या मेरी कोमविरुद्ध विजय मिळवून राष्ट्रकुल संघात पोहोचलेल्या पिंकीने पापुआ न्यू गिनियाच्या जॅक्विलिनचा 3-0 असा धुव्वा उडवला व उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. पुरुषांच्या 69 किलोग्रॅम वजनगटात युवा मुष्टियोद्धा मनदीप जांगराने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत किमान कांस्य निश्चित केले. त्याच्या प्रतिस्पर्ध्याला वैद्यकीय चाचणी पार न करता आल्याने त्याची आगेकूच सोपी ठरली.

Leave a Comment