धनगर समाजाचा एसटीत समावेश करण्यासाठी मुंबईत शक्तीप्रदर्शन

dhangar
मुंबई – राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाचा तिढा न सुटल्याने आज मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. सकाळी 11 वाजता धनगर समाजाचा महामोर्चा राणीचा बाग येथून काढण्यात आला आणि यामध्ये धनगर समाज पारंपरिक वेशभूषेसह शेळय़ा मेंढय़ांसह सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसात राज्यभरात धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये करावा यासाठी चांगलेच वातावरण तापले होते. तसेच समाजाच्यावतीने पंढरपूर ते बारामती अशी यात्रा देखील काढण्यात आली होती. मात्र, धनगर समाजाच्या या मागणीला राज्य सरकारमधील आदिवासी समाजाच्या मंत्र्यांनी विरोध केला आहे. आदिवासी समाजाचे मंत्री मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांनी गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केला होता. त्यामुळे धनगर समाज अधिकच आक्रमक झाला होता. ज्या ठिकाणी समाजाचे वर्चस्व आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात मोडतोड तसेच जाळपोळीचे प्रकार देखील घडले होते. धनगर समाजाचा एसटीत समावेश व्हावा यासाठी काही नेते पुण्यात उपोषणाला बसले होते. मात्र, आघाडी सरकारचा या समाजाच्या मागणीला असलेला विरोध पाहता महायुतीतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांनी महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर धनगर समाजाच्या नेत्यांनी हे उपोषण मागे घेतले.

Leave a Comment