भारतीय संघावर कोसळणार पराभवाची दरड!

india
साउथम्पटन – इंग्लंडविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात ४४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघावर पराभवाची दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चार गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. आज सामन्याचा अंतिम दिवस असून भारताला विजयासाठी ३३३ धावांची गरज आहे.

इंग्लंडने दुस-या डावात कर्णधार अॅलिस्टर कूक (७०) आणि ज्यो रुट(५६) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २०५ धावा करुन डाव घोषित केला. भारताकडून रविंद्र जडेजाने तीन तर भुवनेश्वर कुमारने एक गडी बाद केला.

त्यानंतर विजयासाठी ४४५ धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मुरली विजय केवळ १२ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजाराही दोन धावा काढून बाद झाला. हे दोन्ही भरवश्याचे फलंदाज बाद झाल्यामुळे भारताची अवस्था दोन बाद २९ अशी झाली होती. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी तिस-या विकेटसाठी काही धावा जोडल्या मात्र धवन ३७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कोहली सुद्धा २८ धावा करुन बाद झाला.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा मैदानात होते. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ३३३ धावांचा डोंगर पार करायचा आहे तर इंग्लंडला केवळ सहा गडी बाद करायचे आहेत.

त्याआधी भारताचा पहिला डाव ३३० वर संपुष्टात आला. मात्र इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता दुस-या डावास सुरुवात केली होती.

चौथ्या दिवशी आठ बाद ३२३ धावांवरुन पुढे भारताने खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र इंग्लडच्या भेदक मा-यासमोर भारताला अवघ्या सात धावा करता आल्या आणि भारताचा डाव ३३० धावांत संपुष्टात आला.