आणखी एका दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

kalis
जोहान्सबर्ग – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 38 वर्षीय जॅक्स कॅलिसने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. यामुळे जागतिक स्तरावरील महान, अष्टपैलू खेळाडू म्हणून विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या त्याच्या तब्बल 2 दशकांच्या प्रदीर्घ, देदीप्यमान कारकिर्दीची सांगता झाली. अलीकडेच लंकन दौ-यात खराब प्रदर्शन झाल्याने कॅलिसला तातडीने निवृत्तीच्या निर्णयाप्रत यावे लागले. या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जरी अलविदा केला असला तरी आयपीएल व अन्य टी-20 लीगमध्ये मात्र खेळत राहणार आहे.

166 कसोटी सामन्यांत कॅलिसने 45 शतकांसह 13,289 धावा झळकावल्या. यात 58 अर्धशतकांचाही समावेश राहिला. कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी 55.37 इतकी राहिली. त्याने सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसरे स्थान प्राप्त केले. याशिवाय, त्याने डावात 5 बळी घेण्याचा विक्रम 5 वेळा केला तर 292 बळीही नोंदवले. त्याने या क्रिकेट प्रकारात क्षेत्ररक्षणात आपला दर्जा सिद्ध करताना 200 झेल घेतले.

वनडे क्रिकेटमध्ये त्याने 328 सामने खेळताना 17 शतके, 86 अर्धशतकांसह 11,579 धावा जमवल्या. त्याने सलग पाच आयसीसी विश्वचषक स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले असून अष्टपैलू योगदानाची क्षमता असल्याने त्याची सातत्याने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांच्याशी तुलना केली गेली. अगदी अलीकडेच राहुल द्रविडने देखील कॅलिसची प्रशंसा करताना सचिननंतर कॅलिस हाच सर्वोत्तम खेळाडू ठरतो, असे म्हटले होते.

आगामी 2015 वर्ल्डकप खेळण्याची कॅलिसची महत्त्वाकांक्षा होती. पण, श्रीलंकेविरुद्ध 3 डावांत केवळ 5 धावांच जमवता आल्याने त्याने लगोलग निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. `श्रीलंकेत मला आणखी खेळू शकता येत नसल्याची तीव्रतेने जाणीव झाली. लंकेविरुद्ध खेळलेल्या आमच्या संघातील अनेक खेळाडू दर्जेदार आहेत आणि ते मार्च महिन्यात होणारी विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतात’, असे कॅलिसने पत्रकातून नमूद केले.

Leave a Comment