हरप्रीत सिंगने साधला रौप्यावर नेम

harpreet
ग्लास्गो : भारताच्या हरप्रीत सिंगने 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक मिळवून दिले असून अटीतटीच्या शूटऑफमध्ये पेनल्टी गुण लादल्यानंतरही त्याने पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले.

या प्रकारात भारताची लाज हरियाणाच्या 22 वर्षीय हरप्रीतने राखली असेच म्हणावे लागेल. कारण विजय कुमारकडून देखील याच प्रकारात ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पदकाची अपेक्षा केली जात होती. पण त्याला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत त्याला सातवे स्थान मिळाले. पात्रता फेरीतील पहिल्या सहा जणांनाच अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते.

हरप्रीतने पात्रता फेरीतच अव्वल स्थान मिळविले होते. त्याने सिक्स शूटर अंतिम फेरीत 21 वेळा टार्गेटवर अचूक नेम साधला. यामध्ये पाच शॉट्सच्या आठ फेऱया घेण्यात येतात. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड जे. चॅपमनने टार्गेटवर 23 वेळा अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावले तर कॅनडाच्या मेटोडी इगोरोव्हने शूटऑफनंतर कांस्यपदक निश्चित केले. हरप्रीतने 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके 25 मी. सेंटर फायर पिस्तूल एकेरी व 25 मी. सेंटर फायर पिस्तूल दुहेरीत मिळविली होती.

Leave a Comment