राज्यात ३१ कोटी रोपांची लागवड

trees
सांगली : शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत ३१ कोटींहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली असून, रोपांच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.

पलूस तालुक्यातील कुंडल येथील कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (फॉरेस्ट अँकॅडमी) येथे सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाला पर्याय नाही. राज्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहीम शासनाने हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत आतापर्यंत राज्यात ३१ कोटी रोपांची लागवड झाली आहे. यंदाच्या पावसाळय़ात जास्तीत जास्त रोपे लावण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी वन विभागाबरोबरच महसूल, ग्रामविकास विभाग यासह सर्वच शासकीय, निमशासकीय विभागांचे सहकार्य घेऊन वृक्षारोपणाची मोहीम लोकसहभागाद्वारे यशस्वी करण्याचा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच यंदाच्या पावसाळय़ात राज्यात जवळपास १0 कोटी झाडे लावण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत आतापर्यंत १0 लाख रोपे लावली असून, जिल्ह्यात शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागातून जास्तीत जास्त झाडे लावून त्याच्या संगोपनास प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Leave a Comment