‘माळीण’ गावावर कोसळला डोंगर

dard
पुणे : भीमाशंकर या विख्यात तीर्थक्षेत्राजवळ माळीण या पुनर्वसितांच्या वाडीवर अक्षरश: डोंगर कोसळल्याची भीषण घटना आज सकाळी घडली. या घटनेत गावातील सर्व ४४ घरे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. बचावकार्य सुरू असताना संध्याकाळपर्यंत १७ मृतदेह ढिगा-यातून बाहेर काढण्यात असून आणखी सुमारे ४०० लोक ढिगा-याखाली असल्याची शक्यता आहे. पावसाची संततधार आणि घटनास्थळी झालेला चिखल यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

गावातील दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापनाची दोन, तळेगाव येथून लष्कराची दोन मदत पथके; आळंदी आणि शिरूर येथील नगरपालिकांचे कर्मचारी आणि काही स्वयंसेवी संस्थांची पथके बचाव आणि मदतकार्यासाठी माळीण येथे पोहोचली आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची पहाणी केली. उद्या गृहमंत्री राजनाथ सिंह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे घटनास्थळी भेट देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त आहे.

मंगळवार पासून पुणे शहर आणि जिल्हा परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यातच आज बुधवारी सकाळी माळीण गावाच्या मागे उभ्या असलेल्या डोंगर कड्याची माती खचून हा संपूर्ण कडा चिखलाच्या लोटासह अख्ख्या गावावर कोसळला. झोपेत असलेल्या किंवा नुकतेच जागे होऊन दैनंदिन कामाच्या तयारीला लागलेल्या ग्रामस्थांना पूर्णपणे बेसावध अवस्थेत गाठून काळानेच जणू त्यांच्यावर घाला घातला. या मोठ्या आपत्तीचा गावाबाहेर कोणाला पत्ताही लागला नव्हता. गावात येणारी पहिली एसटी बस घेऊन येणारे चालक प्रताप काळे यांना गावाजवळ आल्यावर धक्काच बसला. गावाच्या वेशीवर असलेल्या शाळेच्या इमारतीखेरीज गावाचा इतर कोणता मागमूसही त्या ठिकाणी शिल्लक नव्हता. घरांसह गावातील रस्ता गायब झालेला होता. संपूर्ण गावावर चिखलाचे ढीग केवळ शिल्लक होते. या भीषण परिस्थितीची कल्पना आल्यावर काळे यांनी स्वत: सावरून मोबाईलवरून आपले सहकारी आणि अधिका-यांना या आपत्तीची माहिती त्यानंतर ही दुर्दैवी घटना जगासमोर आली आणि बचाव आणि मदत कार्यासाठी धावपळ सुरू झाली.

मात्र दुर्गम परिसर, मोबाईलसारख्या दळणवळण यंत्रणांना आवश्यक ‘सिग्नल’ उपलब्ध नसल्याने दळणवळण यंत्रणेचा अभाव, सतत सुरू असलेला पाऊस आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे जेसीबीसारख्या यंत्रणा निरुपयोगी ठरलेल्या; परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. एवढे करूनही गावातील जणांना या संकटातून जीवदान देता येईल; हीच चिंता बचावकर्त्यांना आहे.

Leave a Comment