
साउथम्पटन : भारताने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटीच्या तिस-या दिवसअखेर अजिंक्य रहाणे (54 धावा, 5 चौकार) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 5० धावा, 5 चौकार, 1 षटकार) यांच्या अर्धशतकी खेळीसह रविंद्र जडेजा (31) व विराट कोहली (39) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर फॉलोऑन टाळण्याच्या आशा कायम राखल्या. पहिल्या डावातील इंग्लंडच्या 7 बाद 569 (डाव घोषित) धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताने पहिल्या डावात आज तिस-या दिवसअखेर 8 बाद 323 धावांची मजल मारली. भारताला इंग्लंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप 246 धावांची गरज असून 2 विकेट शिल्लक आहेत.
भारतावर फॉलोऑनचे संकट
भारताला अद्याप फॉलोऑन टाळण्यासाठी 47 धावांची गरज असून टीम इंडियाच्या आशा नाबाद फलंदाज महेंद्रसिंग धोनी (नाबाद 5०) आणि मोहम्मद शमी (नाबाद 4) यांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. यजमान इंग्लंडला सामन्यावरील पकड मजबूत करण्यात यश भारताचे आघाडीच्या फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाल्यामुळे आले.
भारताच्या जवळजवळ र्सवच फलंदाजांनी कालच्या 1 बाद 25 धावसंख्येवरुन पुढे खेळताना चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. इंग्लंडतर्फे जेम्स अॅन्डरसन (3-52) आणि स्टुअर्ट ब्रॉड (3-65) आणि मोईन अली (2-62) यशस्वी गोलंदाज ठरले. रोहित शर्मा (28) आणि अजिंक्य रहाणो (54) यांनी चुकीचे फटके खेळून मोईन अलीला विकेट बहाल केली. रोहितने रहाणोसोबत 74 धावांची भागीदारी केली. मोईन अलीच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. त्यानंतर धोनीने जडेजासोबत (31) सातव्या विकेटसाठी 58 धावांची तर भुवनेश्वर कुमारसोबत (19) आठव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी करीत भारताला तीनशेचा पल्ला ओलांडून दिला.
त्याआधी, भारताची 4 बाद 136 अशी अवस्था असताना अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा (28) यांनी पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करीत डाव सावरला.
