ठाणे जिल्ह्याला धो डाला!

rain
भिवंडी – शनिवारपासून बुधवारी पहाटेपर्यंत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात धुवांदार पाऊस कोसळत असून कसारा घाटात बुधवारी पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक कोलमडली आहे.

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बदलापूर गावाशी संपर्क तुटला आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही पाणी साचले आहे. मुरबाड तालुक्यातील कापरी पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील ४० गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे.

विक्रमी पावसाची ठाणे जिल्ह्यात नोंद झाली असून, आभाळ फाटल्यागत बरसणा-या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील कामावरी, वारणा नद्यांना पूर आला आहे. गणेशपुरी, अकलोली परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, डहाणू पट्ट्यातील सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली डहाणू बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले आहे. डहाणूतील धामणा, कवडास, धरणातील पाणीसाठयात कमालीची वाढ झाली असून डहाणूजवळील साखरा धरण मंगळवारी भरून वाहू लागले. सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पालघर तालुक्यातील मासवण पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टिटवाळानजीक रुंदे गावातील काळू नदी पुलावरून वाहत असल्याने आंबवली, फळेगावसह नजीकच्या १२ गावांचा संर्पक तुटला आहे. ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे.

वसई, नालासोपारा, विरार परिसरात कोसळणा-या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. विरार पूर्वेकडील उसगाव, भाताने, पारोळ भागातील अनेक गावांसह २० पाड्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Comment