मत्स्य व्यवसायाला मोठी संधी

fishing
सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने करत आलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकर्‍यांना हा व्यवसाय करणे शक्य नाही. असे असले तरी नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्य व्यवसाय करणे शक्य झालेले आहे. सरकार आणि शेतकरी यांचे या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे म्हणावे तेवढे लक्ष नाही. देशामध्ये होणार्‍या एकूण मत्स्य व्यवसायात गोड्या पाण्यातील आणि शेतकर्‍यांनी करावयाच्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास भरपूर वाव आहे. परंतु ते प्रमाण म्हणावे तेवढे वाढत नाही. ते वाढवल्यास शेतकर्‍यांना मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी संवर्धन हा व्यवसाय विकसित होऊ शकतो. ुपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आणि मच्छिमार यांव्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला असल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यवसायात सरकारची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

कितीही झाले तरी ही सारी जलाशये सरकारी मालकीची असतात आणि त्यात मत्स्य व्यवसाय करणे, त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळणे या गोष्टी सरकारच्या स्वाधीन असतात. शेतकर्‍यांना त्यात ङ्गारसे स्वातंत्र्य मिळत नाही. परंतु शेतकर्‍यांना आता आपल्या मनाप्रमाणे मत्स्य व्यवसाय करता येईल, अशी एक सोय उपलब्ध होणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शेततळी निर्माण करण्याची मोठी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये शेततळी तयार होत आहेत. सरकार त्याला भरपूर मदतही करत आहे. शेततळ्यांमुळे पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सुटत आहेच. पण ज्यांच्या शेतात शेततळी तयार केली जात आहेत त्यांना त्या शेततळ्याच्या रुपाने मत्स्य व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेताला पाण्याचा पुरवठा आपल्या मनाप्रमाणे करता यावा यासाठी नाही तरी तळ्यातले पाणी साठवून ठेवले जातेच. परंतु ते पाणी उगाच साठवण्यापेक्षा त्यात जर माशांची अंडी सोडली तर जेवढा काळ पाणी साठवले जात असेल तेवढा काळ आयताच मत्स्य व्यवसाय होऊन जातो. शेततळ्यात पाणी असेपर्यंत अशी मत्स्य शेती करावी आणि पाण्याचा वापर संपून आता शेततळे मोकळे करण्याची पाळी आली आहे असे वाटले की, आहेत तेवढे मासे काढून विकून टाकावेत आणि तळे मोकळे करावे. पुढच्या वर्षी पुन्हा शेततळ्यात पाणी आले की, नव्याने पुन्हा माशांची अंडी विकत आणावीत आणि पाण्यात सोडून द्यावीत. पुन्हा पाणी असेपर्यंत नवा मत्स्य व्यवसाय होऊन जातो आणि पाण्याच्या संकटातून मुक्तता होण्याबरोबरच एक जोडव्यवसाय शेतकर्‍याला उपलब्ध होतो. मत्स्य व्यवसायाला ङ्गारसा खर्च येत नाही. काही प्रमाणात माशांसाठी खाद्य टाकावे लागते. त्याशिवाय मासे शेवाळ खाऊन सुद्धा जगतात.

मासे पाण्यात जगत असले तरी त्यांना ऑक्सिजनची गरज लागत असते आणि तशी सोय करण्याचे काही उपाय आहेत त्यांची माहिती करून घेतली की, सामान्य शेतकरी सुद्धा शेततळ्याच्या जोरावर उत्तम मत्स्य शेती करू शकतात. मासे हे बर्‍याच लोकांचे खाद्य असल्यामुळे मासे विकण्याची काही अडचणही येत नाही. खरे तर आपल्या देशाला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. तामिळनाडू, केरळ, ओरिसा, प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, पॉडिचेरी, गुजरात, या राज्यांना विस्तृत समुद्र किनारा लाभलेला आहेे. समुद्रातल्या पाण्यात अनेक प्रकारचे जलजीव आहेत पण त्यांचा अजूनही आपल्याला माग लागलेला नाही. समुद्राच्या पोटात आपण फारतर १०० मीटर खोलीपर्यंत पोचलो आहोत. समुद्राची खोली त्यापेक्षा किती तरी जास्त आहे. त्याची कमाल खोली ६ किलो मीटर आहे. त्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रतत्न केला तर आपल्याला फार मोठा खजिना सापडणार आहे. तसे प्रयत्न जारी आहेत आणि येत्या काही वर्षात हा खजिना आपल्याला हस्तगत करता येईल असे संशोधन करण्यात येत आहे.