मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र सदनातील वादाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष ?

prithviraj
मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील चपाती राड्याची माहिती पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमधून कळल्याचा दावा केला असला तरी हा वाद ज्या दिवशी घडला त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण जाणूनबुजून मुख्यमंत्री चव्हाण यांनी चिघळू दिले की काय यावर चर्चा रंगली आहे.

शिवसेना खासदारांनी १७ जुलै रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील जेवणाचा सुमार दर्जा आणि अन्य समस्यांमुळे संतापलेल्या कॅंटिनमधील मुस्लीम तरुणाला चपाती भरवून त्याचा रोजा मोडला होता. पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकले आणि शिवसेना खासदारांचे प्रताप जगासमोर आले. या घटनेमुळे सर्वत्र शिवसेना खासदारांवर टीकाही झाली. या वादाची काहीच माहिती नसल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता ज्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर या वादाची माहिती घेतली असा कांगावा केला होता. मात्र चव्हाण यांना ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी माहिती देण्यात आली होती अशी माहिती सरकारी कागदपत्रांवरुन समोर आली आहे. सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी १७ जुलै रोजी शिवसेना खासदारांनी केलेल्या कृत्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला गोपनीय अहवाल पाठवला होता. यानंतर बिपीन मलिक यांनी कँटिनमधील संबंधीत कर्मचारी आणि आयआरसीटीसी या दोघांचीही माफी मागितली होती. तसेच मलिक यांना राज्याचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी योग्य कारवाईचे आदेश दिले.

चव्हाण यांनी २० जुलै रोजी दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्र सदनात भेट दिली होती. त्यावेळीही त्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने या वादावर रमझानच्या काळात तणाव निर्माण होऊ नये यासाठी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर राज्याचे सचिव सहारिया यांना चव्हाण यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. एका वरिष्ठ सनदी अधिका-याने ‘महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई केली’ अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. चव्हाण यांनी हा वाद चिघळावा आणि शिवसेनेची कोंडी व्हावी यासाठी या वादाकडे दुर्लक्ष केले का यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Leave a Comment