पर्यटकांचा सर्वाधिक प्रिय धबधबा; सवतसडा

satwsada
कोकणात जेवढे धबधबे आहेत त्यापैकी पर्यटकांचा सर्वाधिक प्रिय धबधबा म्हणून सवतसडा या धबधब्याची ओळख आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण रेल्वेस्टेशनपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असणाऱ्या सवतसडय़ाचे महामार्गावरूनच विलोभनीय दर्शन होत असल्याने शेकडो पर्यटक येथे ओले चिंब होण्यासाठी आणि भिजण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी थांबतात. चिपळूण जवळील पेढे या गावामध्ये असणारा हा धबधबा परशुराम मंदिराजवळील सह्याद्री पर्वतातून कोसळतो. १०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून कोसळणारा हा धबधबा बारमाही नाही. जून महिन्याच्या अखेरीस याची खरी शोभा पाहायला मिळते. मात्र यावर्षी २ जूनला सुरु झालेल्या पावसाने विश्रांती न घेतल्याने सवतसडय़ासह कोकणातील सर्वच धबधबे ओसंडून वाहात आहेत.

सवतसडा धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली असून बाजूने सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंगही बसविण्यात आली आहेत. महामार्गापासून ५०० मीटर आतमध्ये गेल्यावर सवतसडा धबधब्याजवळ पोहोचता येते. जवळ गेल्यावर खूप उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार बेधुंद करून टाकतात. धबधब्याच्या आजूबाजूला झाडी असल्यामुळे हे एक निसर्गरम्य पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून ख्याती पावले आहे. धबधब्याखाली अंघोळीचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर आलेला गारवा दूर करण्यासाठी खाण्यापिण्याचे छोटे-छोटे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तेथे भाजलेली कणसे तसेच फराळाचे विविध पदार्थ मिळतात.

या धबधब्यावर चार ते पाच तासांचा वेळ सहज निघून जातो. छायाचित्रणासाठीही सवतसडा हे ठिकाण प्रसिद्ध असून येथे विविध अंगलने असंख्य पर्यटक सवतसडा या पर्यटनस्थळी येत असतात. या ठिकाणापासूनच जवळच असलेल्या परशुराम घाटातून वशिष्टी नदीचे पावसाळ्यातील विलोभनीय दर्शन घडते, तसेच जवळच असणाऱ्या परशुराम मंदिराचेही दर्शन घेता येते.

जवळचे रेल्वे स्टेशन: चिपळूण- अंतर २ किमी
जवळचे बस स्थानक: चिपळूण- अंतर ५ किमी
राहण्याची सोय: एमटीडीसी

Leave a Comment