न्यायालयीन निवाड्यापर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा: मुख्यमंत्री

prithviraj
मुंबई: बेळगावच्या सीमाप्रश्नावर न्यायालयाचा निकाल जाहीर होईपर्यंत बेळगाव आणि विवादित सीमा भाग केंद्रशासित करावा;या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्याचे शिष्टमंडळ रवाना करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. येळ्ळूर येथील मराठी भाषकांना अमानुष मारहाण करणा-या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येळ्ळूर येथून जिल्हा प्रशासनाकडून हटविण्यात आलेला महाराष्ट्र राज्याचा फलक महाराष्ट्रवादी नागरिकांनी पुन्हा उभारल्यावरून स्थानिक पोलिसांनी मराठी भाषकांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या या गुंडगिरीतून महिला, वृद्ध आणि मुलांचीही सुटका झाली नाहॆ. या प्रकारचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र निषेध केला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित आहे. या वादाचा निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित ठेवावा; असा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल; असे चव्हाण यांनी सांगितले.

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या ‘नाराजी’नामा नाट्यात राणे यांनी आपल्यावर व्यक्तिगत टीका केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. राणे यांच्या नाराजीला आपण जबाबदार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देताना त्यांना कोणती आश्वासने देण्यात आली; त्यांची पक्षश्रेष्ठींबरोबर काय चर्चा झाली; याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. त्यामुळे राणे यांच्या नाराजीवर मार्ग काढणे; ही बाब आपल्या नव्हे; तर श्रेष्ठींच्याच हातात आहे; असेही ते म्हणाले.

Leave a Comment