धनगर समाजाचे बेमुदत उपोषण मागे; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई सफल

dhangar
पुणे: भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर धनगर समाजाच्या नेत्या- कार्यकर्त्यांनी बारामती येथे असलेले आंदोलन मागे आहे. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे; या मागणीसाठी नऊ दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या समजावणीला प्रतिसाद देऊन धनगर समाजाच्या नेत्यांनी उपोषण मागे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळापासून धनगर समाजाने अनुसूचित जमातीत आरक्षण मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडे, राज्य केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तत्कालीन सत्ताधा-यांनी त्यावेळीही या मागणीकडे लक्ष दिले नाही. मात्र शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन माढ्यातून निवडणूकही लढविली.

आता आगामी विधानसभा निवडणुका तोडावर असताना सत्ताधा-यांनी मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र धनगर समाजाच्या जुन्या मागणीबाबत मात्र मूग गिळून बसण्याची भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी बारामती येथे बेमुदत उपोषण सुरू केले. त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने संतप्त जमावाने पंढरपूर येथून कराडला निघालेली बस पेटविण्याचा प्रकारही सोमवारी घडला.
मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, प्रवक्ते माधव भंडारी, पंकजा मुंढे, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी जानकर यांच्यासह आंदोलकांची भेट घेऊन ‘हिंसक आंदोलनात आपली शक्ती वाया घालवू नये;’ असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन धनगर समाजाने आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Leave a Comment