द. आफ्रिकेचा कसोटी मालिका विजय

south-africa
कोलंबो – द. आफ्रिकेने लंकेविरुद्धची कसोटी मालिका हशिम आमलाच्या पहिल्याच नेतृत्वाखाली 1-0 अशा फरकाने जिंकली. उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत राहिली.

लंकेने या दुस-या कसोटीत पहिल्या डावात 421 धावा जमविल्यानंतर द. आफ्रिकेचा पहिला डाव 282 धावांत आटोपला. लंकेने दुसरा डाव 8 बाद 229 धावांवर घोषित करून द. आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 369 धावांचे कठीण आव्हान दिले. द. आफ्रिकेने 1 बाद 38 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला पण चिवट फलंदाजीमुळे द. आफ्रिकेने 111 षटकांत 8 बाद 159 धावा जमवित लंकेला मालिका बरोबरीपासून वंचित केले. लंकेच्या हेराथ आणि डी. परेरा यानी भेदक गोलंदाजी केली. द. आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. द. आफ्रिकेतर्फे डिकॉकने 92 चेंडूंत 1 चौकारासह 37, कर्णधार आमलाने 4 चौकारांसह 25 तर फिलँडरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 98 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 27 धावा जमवित हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. खेळाच्या शेवटच्या दिवशी उपाहारापूर्वी पावसाचा अडथळा आला. उपाहारावेळी द. आफ्रिकेने 2 बाद 55 धावा जमविल्या होत्या. चहापानापर्यंतच्या दुसऱया सत्रात द. आफ्रिकेने आणखी दोन गडी 49 धावांत गमविले. चहापानावेळी द. आफ्रिकेची स्थिती 4 बाद 104 अशी होती. खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर द. आफ्रिकेने काही वेळातच आणखी दोन फलंदाज गमविले. 6 बाद 118 अशी केवीलवाणी स्थिती असताना पुन्हा पाऊस आल्याने खेळ थांबविण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी पुन्हा खेळाला प्रारंभ केला. डुमिनी आणि स्टीन हे दोन फलंदाज बाद झाल्याने द. आफ्रिकेच्या संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले होते पण फिलँडर आणि ताहीर यानी शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून हा सामना अनिर्णीत राखला. लंकेच्या हेराथने 40 धावांत 5 तर डी. परेराने 60 धावांत 3 गडी बाद केले.

Leave a Comment