अतिसार नियंत्रण पंधरवड्याला राज्यात सुरुवात

dysentry
अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी देशभरात अतिसाराविरुद्धच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातही आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते अतिसार नियंत्रण विशेष पंधरवड्याचे आज उद्घाटन करण्यात आले. 28 जुलै 2014 ते 8 ऑगस्ट 2014 या काळात ही मोहीम राबवली जाणार आहे. अतिसारामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 0 ते 5 वर्षे वयोगटात मोठ्या प्रमाणावर होणारा आजार म्हणून अतिसाराची ओळख आहे. यामुळे दगावणाऱ्या लहान मुलांचे प्रमाणही धक्कादायक आहे. देशात अतिसारामुळे दरवर्षी 2 लाख बालमृत्यू होतात. महाराष्ट्रात 2013 मध्ये अतिसारामुळे 1094 बालकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्रात ‘युनिसेफ’च्या सहकार्याने ही मोहीम सुरू करण्यात आली असून पहिल्या आठवड्यात बालकांमधील अतिसाराचे प्रमाण कमी करणे आणि तो होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या आठवड्यात नवजात बालके आणि लहान मुले यांच्या आहारावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याशिवाय या पंधरवड्यात जनजागरण मोहिम,अतिसार आजारासाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सेवा देणे तसेच ओआरएएस आणि झिंक कॉर्नरची स्थापना करणे, आशा कार्यकर्तीमार्फत ओआरएस पॅकेट वाटप करणे, कुपोषित बालके शोधणे आणि त्यांच्यावर उपचार करणे आदी बाबींवरही विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

दरम्यान, अतिसार आजाराच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती देणाऱ्या प्रशिक्षण पुस्तिकेचंही आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजात सैनिक, युनिसेफच्या राज्याच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.​

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment