इंग्लंड भक्कम स्थितीत; भारताची अडखळत सुरुवात

england

साऊदम्प्टन – तिस-या कसोटीच्या दुस-या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव 7 बाद 569 धावांवर घोषित केला. कसोटीतील 21 वे शतक इयान बेलने झळकवले तर कसोटी क्रिकेटमधील 7000 धावांचा टप्पाही पूर्ण केला तर जोस बटलरने 83 चेंडूत 85 धावा फटकावल्या. भुवनेश्वर कुमारने भारतातर्फे 3 बळी मिळविले. भारताने दिवसअखेर 1 बाद 25 धावा जमविल्या.

शतकवीर गॅरी बॅलन्स व इयान बेल यांनी भारताच्या निष्प्रभ गोलंदाजीचा लाभ घेत 2 बाद 247 या धावसंख्येवरून संघाची स्थिती आणखी भक्कम केली. इंग्लंडने पहिल्या सत्रात फक्त एका गडय़ाच्या मोबदल्यात 29 षटकांत 111 धावांची भर घातली. या सत्रात पार्ट टाईम स्पिनर रोहित शर्माला अनपेक्षित यश मिळाले. त्याने बॅलन्सला धोनीकरवी झेलबाद केले. पण हा निर्णय संशयास्पद होता. फलंदाजीस अनुकूल असणा-या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी सहजतेने फलंदाजी केली. या मालिकेत व आधीच्या मालिकेतही फारशी चमक दाखवू न शकलेला बेल उपाहारावेळी 68 व जो रूट दोन धावांवर खेळत होता. बेल व बॅलन्स या जोडीने तिस-या गडय़ासाठी 142 धावांची भागीदारी केली.

दुस-या दिवशी भारतीय गोलंदाजांना फक्त दहा षटके झालेल्या नव्या चेंडूवर झटपट बळी मिळविण्याची गरज होता. पण प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. पहिल्या अर्ध्या तासात बेल-बॅलन्स यांनी भुवनेश्वर व पंकज सिंग यांच्यासमोर सावध खेळ केला. शमीला आठ षटके झाल्यानंतर गोलदांजीस आणण्यात आले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा फारसा प्रभाव पडलेला नाही. त्यांनी बरीचशी स्वैर गोलंदाजी केली. अधूनमधून काही चांगल्या चेंडूवर फलंदाज चकत होते. पण हा अपवाद वगळता इंग्लिश फलंदाजांनी सफाईने फलंदाजी करीत जलद धावा जमविल्या. संघाचे त्रिशतक 103 व्या षटकांत पूर्ण झाले. बेल जास्त आक्रमक खेळत होता. त्याने जडेजाला पुढे सरसावत पहिला षटकार ठोकला. त्याच्या आक्रमकतेमुळे इंग्लंडने केवळ 10 षटकांत 47 धावा फटकावल्या होत्या.

भारताने दिवसअखेर पहिल्या डावात 14 षटकांत 1 बाद 25 धावा जमविल्या. मुरली विजय 11, पुजारा 4 धावांवर खेळत आहेत. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो सातव्या षटकात 6 धावांवर बाद झाला.