दंगली आणि राजकारण

riots
उत्तर प्रदेशात रामजन्मभूमीचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा हिंदुत्वाची लहर निर्माण झाली आणि तिच्यावर सवार होत भाजपाने दिल्लीची गादी मिळवली. पण आताही भाजपाचा तसाच प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. कारण उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जातीय दंगलींना सुरूवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यात या राज्यात जातीय तणाव आणि त्यातून हिंसाचार असे १३ प्रकार घडले आहेत. या प्रकारांमागे नेमका कोणाचा हात आहे याबाबत भाजपा, कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचे आपापसात आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातले तथ्य शोधले पाहिजे. उत्तर प्रदेशात अनेक मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि ते भावनेच्या आहारी जाऊन संघटितपणे मतदान करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर राजकारण फार केले जाते. तिथे लोकांच्या जातीय भावनाही लवकर भडकतात आणि हां हां म्हणता दंगली पेटतात. त्या लवकर विझत नाहीत आणि त्यांचे परिणाम अनेक वर्षे टिकतात.

त्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असणे ही एक चैन वाटावी इतकी दुमिळ असते. तिथे कोणा तरी सुमार क्षमतेच्या मुख्यमंत्र्याच्या हातात सत्ता असल्यास तर मग काही विचारायलाच नको. सध्या तसेच सुला आहे. गेल्या दोन महिन्यात तिथे सामूहिक बलात्कार आणि हत्या यांचे अनेक प्रकार घडले. हे प्रकार तर दुर्दैवी आहेतच परंतु उत्तर प्रदेशाचे नेते मुलायमसिंग यादव आणि त्यांचे दिवटे चिरंजीव मुख्यमंत्री अखिलेशसिंग यांचा याबाबतचा दृष्टिकोन अधिक दुर्दैवी आहे. मुलायमसिंग यादव यांनी बलात्कार करणार्‍या मुलांना फार कठोर शिक्षा देऊ नये असे मत व्यक्त केले आणि नंतर बलात्काराचे प्रकार उत्तर प्रदेशात फारसे होतच नाहीत अशीही मखलाशी केली. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कारभार बघून जाणकार लोकांनी अखिलेशसिंग यादव हे भारतातले सर्वात वाईट मुख्यमंत्री आहेत असा निर्वाळा दिला आहे. एकंदरीत उत्तर प्रदेशातल्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तिथे बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. आता गेल्या दीड महिन्यात जातीय दंगलींचा आगडोंब उसळला आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या जातीय दंगली गाजल्या. त्या दंगलीची झळ बसलेल्या लोकांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. तोच पुन्हा एकदा राज्यात नव्या जातीय दंगली सुरू झालेल्या आहेत. काल सहारनपूर येथे जातीय दंगल उसळली त्यात करोडो रुपयांचे नुकसान झाले. तिथे आता संचारबंदी आणि दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी झाले आहेत. गोळीबारात दोघे मरण पावले आहेत आणि पोलीस अधिकार्‍यांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

मे महिन्यापासून तिथल्या जातीय दंगलींचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, या जातीय दंगली अगदी किरकोळ कारणाने सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, दहा मे रोजी मीरतमध्ये गुजरी बाजार भागामध्ये एक पाणपोई बांधण्यावरून दंगल उसळली. त्यातली एक दंगल केवळ फटाके वाजवण्यावरून झाली. या पाठोपाठ शामली येथे जागेच्या भांडणातून, मोरादाबाद जिल्ह्याच्या कांठ गावात ध्वनीवर्धकावरून तर सर्फाबाद गावामध्ये वादग्रस्त जागेच्या बांधकामावरून दंगली उसळल्या. शहाजहापूर येथे तर चहाच्या टपरीच्या मालकीवरून दंगल उसळली आणि दोघे ठार झाले. मथुरा जिल्ह्यातल्या खामिनी गावात आणि मोरादाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यात जागा आणि ध्वनीवर्धक अशा कारणांवरून दंगली उसळल्या बरेली आणि सहारनपूर येथे असेच प्रकार घडले.

या दंगली प्रामुख्याने हिंदू विरुध्द मुस्लीम अशा आहेत आणि अशा दंगली उसळल्या की त्यानंतरच्या बंदमध्ये, तक्रारी नोंदण्यामध्ये, शांतता प्रस्थापित करण्याच्या बहाण्याने घटनास्थळी येऊन शांतता बिघडवण्यामध्ये राजकीय पक्षांचे पुढारी आघाडीवर असल्याचे दिसले आहे आणि नेहमी असेच घडते. दंगलीमुळे जे जातीय ध्रुवीकरण होते त्याचा फायदा उठवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांचे पुढारी करत असतात. उत्तर प्रदेशाच्या अशा राजकारणात समाजवादी पार्टीचा प्रयत्न मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्याचा असतो. तर भाजपाचा प्रयत्न हिंदू मते संपादित करण्याचा प्रयत्न असतो. या राजकारणात कॉंग्रेसचे नेतेशांतीयात्रा काढून आपला या राजकारणाशी काही संबंधच नाही असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यातून मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा छुपा प्रयत्न असतो हे लपून राहत नाही. या सर्वांचे हे राजकारण सुरूही असते आणि प्रत्येक पक्ष दुसर्‍या पक्षावर तसा आरोपही करत असतो. परंत मुळात या दंगलींची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असते. उत्तर प्रदेशात गेल्या दोन महिन्यात झालेल्या सगळ्या दंगलींची कारणे पाहिली तर ती कारणे एवढी क्षुल्लक असल्याचे दिसते की त्या कारणांचा निपटारा संबंधित पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबलसुध्दा करू शकतो. परंतु राज्य सरकारने याबाबतीत वेळीच दक्षता घेतली नाही म्हणून या क्षुल्लक कारणातून जातीय दंगली पेटलेल्या आहेत. तशा त्या समाजवादी पार्टीला हव्याच आहेत म्हणून हे दुर्लक्ष जाणूनबुजून केले गेलेले आहे. लोकसभा निवडणुुकीत हातून निसटलेला जनाधार पुन्हा प्राप्त करण्यासाठी समाजवादी पार्टीला या दंगली हव्या आहेत.

Leave a Comment