रोम- जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या दंगली, युद्धे, हिंसा आणि रक्तपात थांबवा असे कळकळीचे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी रविवारच्या साप्ताहिक संबोधनात केले आहे. सेंट पीटर्स स्क्वायर येथे ते जनतेला संबोधित करत होते.
रक्तपात, हिंसा थांबवा- पोप फ्रान्सिस
पोप यांनी जगभरात सुरू असलेल्या मानव संहाराचे आपल्याला अतीव दुःख होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले आता लढाया, भांडणे बंद करायची वेळ आलीय. युद्धाला नाही म्हणा. जगात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हिंसाचार आणि लढायामुळे भुकेने तडफडत असलेल्या, ज्यांचे भविष्य अंधःकारमय आहे त्या, जी ठार झाली आहेत, जखमी झाली आहेत, अपंग झाली आहेत आणि ज्यांनी आपले हसणे गमावले आहे त्या सर्व जगभरातील मुलांच्या वतीने मी हे आवाहन करतो आहे. युद्ध पुकारण्यापूर्वी, हिंसाचार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा असे माझे आपल्या सर्वांना कळकळीचे सांगणे आहे.
पोप यांचे हे भाषण पहिल्या जागतिक युद्धाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झाले आहे. पश्चिम आशिया, इराक, युक्रेन येथील संघर्षाबाबत चिंता वाटते असे सांगताना पोप फ्रान्सिस यांनी गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्दाबाबत मात्र कांहीही मत व्यक्त केलेले नाही.