मुंबई – पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डी स्पर्धेला मुंबईच्या नॅशनल स्पोर्टस क्लबवर (वरळी) बिग बी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह सिनेजगतातील तारेतारकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या स्पर्धेची सुरुवात अभिषेक बच्चनच्या जयपूर आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या मुम्बा अर्थात मुंबई या लढतीने झाली. मात्र अपेक्षेप्रमाणे मुंबईने विजयी सलामी दिली. त्यानंतर झालेल्या दुस-या सामन्यात मुंबईच्या पावलावर पाऊल बंगळुरूने ठेवले. मुंबई विरुद्ध जयपूर या लढतीत प्रारंभापासूनच मुंबईने वर्चस्व गाजवले. कर्णधार अनुप कुमारने एकहाती सामन्याची सुत्रे आपल्या हाती ठेवत विश्रांतीलाच 14-7 अशी आघाडी घेतली होती. याच आघाडीच्या जोरावर पुढे जात शेवटी 45-31 असा निर्विवाद विजय संपादन केला. या लढतीत रिशांक देवाडिगा या मूळ मुंबईकराने आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱया अर्थाने सामना पाहायला मिळाला तो अनुपकुमार विरुद्ध मुंबई असाच.
प्रो कबड्डीला भव्य शुभारंभ
बंगळुरूने दुस-या सामन्यात दिल्लीचा 40-28 असा धुव्वा उडविला. बंगळुरूच्या अजयने चढाईचा धारधार खेळ करीत साधारणपणे प्रत्येक चढाईत एक गुण अशा सरासरीने सामन्यावरील आपली पकड मजबूत ठेवली. दिल्लीच्या काशिलिंग आडकेकडून फार मोठय़ अपेक्षा होत्या. सुरवातीला काशिलिंगने प्रत्येक चढाईत एक एक गुण घेत दिल्लीला 7-5 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव फारसा टिकला नाही. बंगळुरूने पकड पाहून काशिलिंगची व्यवस्थित कोंडी केली आणि दिल्लीच्या आक्रमणाची धार बोथट केली. शेवटी अजयने बंगळुरूचा विजय साजरा केला.