येळ्ळूरमध्ये कन्नडिगांची पुन्हा मोगलाई!

boder1
बेळगाव- कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र प्रेमावर व अस्मितेवर कर्नाटक सरकारने रविवारी पुन्हा एकदा दडपशाही करीत घाला घातला ,महाराष्ट्राचा मोडलेला फलक पुन्हा उभारण्याचा मराठी बाणा पाहून संतप्त झालेल्या कन्नड पोलिसांनी मराठी बांधवाना घरात घुसून झोडपून काढल्याची संतापजनक घटना रविवारी घडली. येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कन्नडिगांनी पुन्हा एकदा उद्ध्वस्त केला. मात्र विरोध करणाऱ्या मराठीजणांवर पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला केला, महिलांनाही बेदम मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण येळ्ळूर गावात प्रचंड तणाव आहे.

संपूर्ण मराठी लोकवस्तीचे येळ्ळूर गाव हे अधिकृतरित्या कर्नाटकात येते, पण गावातील लोक मनाने महाराष्ट्रात आहेत. येळ्ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्याचे प्रतीक असलेला ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ हा फलक गेल्या अनेक वर्षांपासून होता. शुक्रवारी अचानक कानड्यांनी पोलीस बंदोबस्तात हा फलक तोडला. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत हजारो मराठीजनांनी तो फलक पुन्हा उभा केला.

हा फलक पुन्हा उभा राहिल्याचे कळताच रविवारी सकाळी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा येळ्ळूरमध्ये धडकला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेला हा फलक उखडून टाकला. या कारवाईला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी बेधडक लाठीहल्ला केला. कानडी पोलिसांच्या अत्याचारातून महिलाही सुटल्या नाहीत. हे कमी म्हणून की काय, पोलिसांनी घरात घुसून आंदोलकांना मारहाण केली.

कर्नाटक सरकारच्या या अत्याचाराविरोधात सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे. मराठी मनावर फिरलेल्या कानडी वरवंट्यानंतर येळ्ळूर गावात ‘अघोषित’ संचारबंदी लागू झाल्याचे चित्र असून प्रचंड तणाव आहे.दरम्यान महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटण्याची दाट चिन्हे आहेत.

Leave a Comment