पुणे : गेला आठवडाभर राज्यात सक्रिय असलेल्या मान्सूनची अनुकुलता घटल्याने पावसाचे प्रमाण आणखी कमी झाले आहे . गेल्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मात्र विदर्भ, मराठवाडा मात्र कोरडाठाक होता. पुढील ४८ तासांत राज्यात कोठेही जोरदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनची अनुकुलता घटली ;राज्यात पाऊस ओसरला
अरबी समुद्रात किनारपट्टीजवळ असलेला पट्टा शनिवारी विरला. या दोन्ही पट्टय़ांमुळे राज्यात मॉन्सून सक्रिय होता आणि जोरदार पाऊस पडत होता.
शहरांमधून पावसाचे प्रमाण घटले असले तरी घाटमाथ्यांवर चांगला पाऊस पडत आहे. कोयना घाटात १४0 मिमी, शिरगाव व दावडी घाटात ६0, ताम्हिणी घाटात ५0, भिरा, डुंगरवाडी घाटात ४0 मिमी पाऊस पडला. पुढील दोन दिवसांत कोकणात बर्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मॉन्सून हा उत्तराखंड, कर्नाटक राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार या बेटांवर सक्रिय आहे. त्यामुळे तिथे जोरदार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस उत्तराखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक राज्याचा दक्षिण भाग, अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.