जागावाटप ;राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे कॉंग्रेसची कोंडी

congress
मुंबई – लोकसभा निवडणुकीत दारूण पण अस्तित्वाला हादरा देणाऱ्या पराभवामुळे दोन्ही कॉंग्रेस आता सावध झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व कसे वाढेल यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली असली तरी जागावाटपामुळे आघाडीत बिघाडीचा धूर निघत आहे, एकमेकांना टोलविण्याच्या राजकारणात न जुमानणाऱ्या कॉंग्रेसला आता राष्ट्रवादीने खिंडीत गाठले आहे. जागावाटपाची चर्चा कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यातच होऊ द्या अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.

विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी राज्यातील काँग्रेस नेते मान्य करणार नाहीत हे गृहित धरून राष्ट्रवादी काँग्रेसने ही राजकीय चाल खेळली आहे चर्चा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यातच व्हावी, अशी भूमिका घेवून अगदी निम्म्या जागा मिळाल्या नाही तरी गतवेळच्या तुलनेत काही जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत,असा आग्रह अप्रत्यक्ष धरला आहे.

काँग्रेसने निम्म्या जागांची मागणी फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील जागावाटप आणि राजकीय परिस्थिती यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या निवडक नेत्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. मुंबईत जागा वाटपाची चर्चा झाल्यास फारसे काही हाती लागणार नाही हे राष्ट्रवादीच्या धुरिणांच्या निदर्शनास आले आहे. यामुळेच जागावाटपाची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात नवी दिल्लीतच व्हावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी केली असून गतवेळच्या तुलनेत १५ तरी जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरला जाईल. अपेक्षित प्रतिसाद न मिळाला तरच स्वबळाचा पर्याय असू शकतो.याकडेही पक्षाच्या वर्तुळातून लक्ष वेधले जात आहे. दरम्यान काँग्रेसने मदत केल्यानेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या. पण अशी मदत काँग्रेस उमेदवारांना राष्ट्रवादीकडून झाली नाही, अशी तोफ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये डागली नाही तोच राष्ट्रवादीच्या मदतीमुळेच काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले, असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले आहेत. परिणामी आघाडीचे डावपेच एकमेकांना टार्गेट करण्याचे आहेत की ,महायुतीला चकवा देण्याचे आहेत,यावर आतापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. त्यात आतापर्यंतच इतिहास लक्षात घेता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने जागावाटप असो वा सत्तेतील पदे, प्रत्येक वेळी माघार घेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याच कलाने घेतले आहे.

राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी मान्य करणे शक्यच नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसने चर्चेच्या सुरुवातीला कठोर भूमिका घेतली असली तरी ही भूमिका शेवटपर्यंत कायम राहिलच असे नाही. राज्यतील नेत्यांनी शरद पवार यांना कितीही विरोध केला तरीही काँग्रेसचे नवी दिल्लीतील नेतृत्व पवारांच्या पुढे माघार घेते, असे चित्र नेहमीच समोर आलेले आहे याकडेही लक्ष वेधले जात आहे.

Leave a Comment