कानडी सरकारला शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा

shivsena
मुंबई – बेळगावच्या य़ेळ्ळूर गावात मराठी बांधवांवर अमानुष हल्ला करणारे पोलीस हे खाकी वर्दीतील गुंड ,अतिरेकी आहेत. अशी टीका करताना मुंबईत काय महाराष्ट्रात तुमच्या संस्था ,इमारती ,कार्यालये आहेत ,त्याला अजून आम्ही हात घातलेला नाही असा इशारा कानडी सरकारला शिवसेनेने दिला आहे.

बेळगावच्या येळळूर गावात मराठी भाषकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळळूर’ नावाचा फलक काढण्यासाठी विरोध केल्यामुळे चिडलेल्या कानडी पोलिसांनी घरात घुसुन मराठी भाषिक वृध्द, महिला व बालकांना अमानूष मारहाण केली. हे पोलीस नसून खाकी वर्दीतील गुंड, दहशतवादी व अतिरेकी आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या प्रश्नी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी जाब विचारावा, राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.कान्नडीगांच्या अनेक इमारती, संस्था, कार्यालये मुंबई-महाराष्ट्रात आहेत. अद्याप आम्ही त्याला हात लावलेला नाही, हे कानडी सरकारने ध्यानात घ्यावे. कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराप्रश्नी संसदेत आवाज उठविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मानवी हक्क, कायदे पायदळी तुडवत हेल्मेट, चिलखत परिधान करून निष्पाप मराठी माणसांची डोकी फोडणाऱया कानडी पोलिसांच्या गुंडगिरीवर महाराष्ट्र सरकार गप्प का, असा सवाल करीत आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडू नका, असा गर्भीत इशारा राऊत यांनी दिला आहे. शिवसेना आजपर्यंत मराठी माणसासाठी लढत आली आहे. सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय होत असताना आम्ही गप्प बसणार नाही. त्यांच्यासाठी शिवसैनिक रक्त सांडायलाही तयार आहेत. दिल्लीत ‘चपाती’ प्रकरणावरून गळा काढणारे आता शेपटा घालून बसले आहेत का, असा खडा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment