बाभळी धरण ; राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

supreme-court
नांदेड – ३0 जुलैला पाऊस पडला नाही तर परिस्थिती पाहून तेलंगणासाठी बाभळी धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला असावा यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दोन दिवसांच्या नांदेड, हिंगोली जिल्ह्यांच्या दौर्‍यावर असताना अजित पवार यांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. पवार यांनी राज्यातील विभागवार पाऊस व पीक परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले ,गोदावरी नदीवर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात बाभळी धरण बांधण्यात आले आहे.या धरणासाठी बराचकाळ लढा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३0 जूनला बाभळी धरणातील पाणी तेलंगणासाठी सोडावे लागते; मात्र यावेळी आतापर्यंत पाऊस न झाल्यामुळे व ठरल्याप्रमाणे तेलंगणासाठी पाणी सोडले. यामुळे बाभळी धरण अक्षरश: कोरडे झाले आहे. परिणामी या भागातील लोकांना पिण्याचे पाणी देखील मिळू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.त्यात अलीकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले असून ३0 जूनला पाऊस पडेल याची खात्री नाही. त्यामुळे पाऊस उशिरा झाला तर परिस्थिती पाहून व पुरेसा पाऊस झाल्यानंतरच तेलंगणासाठी बाभळीतून पाणी सोडण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारला असावेत यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment