७९ कोटी डॉलर्सचा फेसबुकला नफा

facebbok
सान फ्रान्सिको – जूनच्या तिमाहीत फेसबुकने ग्राहकांवरील आपले राज्य कायम ठेवले असून कंपनीला ७९.१० कोटी डॉलर्सचा नफा झाला. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या लाटेतही काळानुरूप बदल अंगिकारल्याने मोबाइलवरून फेसबुक वापरणा-यांची संख्या काही कोटींच्या घरात असून याचा कंपनीला मोठा फायदा झाला. यामुळे खूश झालेल्या गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने नॅसडॅक शेअर बाजारात फेसबुकचा शेअर विक्रमी स्तरावर गेला.

३० जून रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत कंपनीला ७९.१० कोटी डॉलर्सचा नफा झाला. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३८ टक्क्यांची वृद्धी झाली. तसेच महसूलही मोठया प्रमाणात वाढला. या तिमाहीत २.९१ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला. यातील जवळपास ६२ टक्के महसूल हा मोबाइल, टॅबलेट आणि स्मार्टफोनवरील जाहिरातींच्या माध्यमातून मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३३.३० कोटी डॉलर्सचा नफा झाला होता. डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये गुगल आघाडीवर असून फेसबुकला यातील हिस्सा वाढवण्यासाठी मोबाइल कॉम्प्युटिंगवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

दरम्यान दररोज फेसबुकला भेट देणा-यांची संख्याही विक्रमी स्तरावर गेली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार महिनाभरात किमान एक वेळ फेसबुकला भेट देणा-यांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली असून ती १.३२ अब्जावर गेली आहे. तर मोबाइलवरून फेसबुक वापरणा-यांची संख्या १.०७ अब्जावर गेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment