समाजातील आपली जबाबदारी ओळखा- नाना पाटेकर

nana
आजकालचे राजकारणी जाती धर्माचा उपयोग राजकारणासाठी करत आहेत. अशा राजकारण्यांना पकडा आणि जाब विचारा. सर्वसामान्य माणूस इच्छाशक्ती असेल तर नरेंद्र मोदी बनू शकतो आणि सर्वसाधारण शेतकर्‍यांतूनही शरद पवार निर्माण होऊ शकतात. समाजातील आपली जबाबदारी ओळखून काम करा असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रचंड संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांना दिला. पुणे पोलिसांतर्फे युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा देशासाठी मी काय करू शकतो असा विचार रूजला गेला पाहिजे असे सांगून ते म्हणाले की सर्वसामान्यांनी मनावर घेतले तर कांहीही अशक्य नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांतून जसे नाना पाटेकर निर्माण होऊ शकतात तसेच मोदी आणि पवारही निर्माण होऊ शकतात. आजचे राजकारणी जाती धर्माच्या नावावर समाजाला भडकावित आहेत. त्यामुळे रस्त्यावर जेव्हा उतराल तेव्हा जात, धर्म घरीच सोडून या. समाजकार्यासाठी हात पुढे करा. धर्मापेक्षा कर्तव्य मोठे आहे याचा विसर पडू देऊ नका.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अद्याप त्याचा तपास लागत नाही ही गंभीर बाब आहे असे सांगून ते म्हणाले की तपासासाठी प्लँचेटचा उपयोग झाला असेल तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त सतीश माथूर, उपायुक्त संजयकुमार आणि संगणक तज्ञ अच्युत गोडबोले उपस्थित होते.

Leave a Comment