महेलाने श्रीलंकेला तारले

mahela
कोलंबो – गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या दुस-या कसोटीत महेला जयवर्धनेच्या नाबाद शतकाच्या जोरावर यजमान लंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 305 धावा जमविल्या. जयवर्धने 140 धावावर खेळत आहे.

नाणेफेक जिंकून लंकेने प्रथम फलंदाजी स्वीकारली. थरंगा आणि संगकारा हे दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सिल्वा आणि जयवर्धने यांनी संघाचा डाव सावरताना तिस-या गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी केली. सिल्वाने 7 चौकारांसह 44 धावा जमविल्या. उपाहारावेळी लंकेने 26 षटकात 3 बाद 115 धावापर्यंत मजल मारली होती.

अनुभवी जयवर्धने आणि कर्णधार मॅथ्यूज यांनी चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वर्चस्व मिळू दिले नाही. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 131 धावांची भागीदारी केली. जयवर्धनेने 137 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. दरम्यान मॅथ्यूजने आपले अर्धशतक 100 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानावेळी लंकेची स्थिती 54 षटकात 3 बाद 212 अशी समाधानकारक होती.

खेळाच्या शेवटच्या सत्रात लंकेने आणखी दोन गडी गमविताना 93 धावांची भर घातली. डुमिनीने मॅथ्यूजला झेलबाद केले. त्याने 6 चौकारांसह 63 धावा जमविल्या. मॉर्नी मॉर्कलने विथांगेला झेलबाद केले. त्याने 13 धावा जमविल्या. दिवसअखेर जयवर्धने 1 षटकार आणि 16 चौकारांसह 140 तर डिक्वेला 12 धावावर खेळत आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे स्टीन आणि डुमिनी यांनी प्रत्येकी 2 तर मॉर्कलने एक गडी बाद केला.

Leave a Comment