
जेरुसलेम – इस्त्रायलने हमास विरोधात जगाने केलेले शांततेचे आवाहन धुडकावून लावत आपले आक्रमक धोरण कायम ठेवले आहे. मागील अठरा दिवसांपासून गाझा पट्टीत सुरु असलेल्या युध्दामध्ये आतापर्यंत आठशेहून अधिक लोक ठार झाले आहेत.
इस्त्रायलचे हमास विरोधात आक्रमक धोरण कायम
पॅलेस्टाईन नागरिकांचा या युध्दामध्ये सर्वाधिक मृत्यू झाला असून यात लहान मुले, स्त्रियांचा समावेश आहे. शस्त्रसंधीसाठी जगातील अनेक देशांनी आवाहन करुनही, इस्त्रायलने अद्यापही दाद दिलेली नाही. गुरुवारी रात्री इस्त्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टाईन नागरीक ठार झाले.
उत्तर गाझामध्ये संयुक्त राष्ट्राच्या एका शाळेमध्ये आस-यासाठी पॅलेस्टीनी नागरीक थांबले होते. या शाळेवर इस्त्रायलने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये १५ पॅलिस्टीनी नागरीक ठार झाले तर, २०० जण जखमी झाले. या घटनेनंतर इस्त्रायलवर शस्त्रसंधीसाठी दबाव वाढू लागला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी इस्त्रायलच्या कारवाईचा निषेध करत, हे हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे.
