मुंबई – महाराष्ट्र सदनातील आंदोलावरून सध्या टीकेचे धनी बनलेल्या शिवसेनेला दिल्लीत एकाकी पाडण्याची राजकीय खेळी जोरदार सुरु असताना सेनेच्या मदतीला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली आहे , खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सेनेसाठी सरसावले आहेत.
सेनेसाठी खुद्द राज ठाकरे सरसावले !
अनवधानाने एखाद्याकडून चूक झाली असेल, तर त्याकडे जातीयतेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बाजू घेतली आहे.
महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या खासदारांनी तेथील एका कर्मचाऱयाचा ‘रोजा’ मोडल्याचा आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, राज ठाकरे यांनी यामध्ये सकृतदर्शनी शिवसेनेच्या खासदारांनी मुद्दामहून असे केल्याचे वाटत नसल्याचे नमूद केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, निकृष्ट दर्जाचे अन्न मिळाले, तर कोणीही ते देणाऱयाला तू खाऊन बघ असे म्हणतोच. समोरची व्यक्ती मुस्लिम आहे की नाही, हे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांना माहिती नव्हते. त्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल माफीही मागितली आहे. त्यामुळे आता हा मुद्दा वाढविण्यात अर्थ नाही.
खासदारांनी स्वतःला सुविधा मिळत नाहीत म्हणून जो राग व्यक्त केला. तो त्याच पद्धतीने राज्यातील नागरिकांना मिळणाऱया अपुऱया सुविधांबद्दलही व्यक्त केला पाहिजे. पण सर्वसामान्यांना मिळणाऱया अपुऱया सुविधांबद्दल हे खासदार रस्त्यावर उतरलेले कधी दिसले नाहीत, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.परिणामी राज यांच्या भूमिकेमागे आगामी राजकीय गणित काय हा प्रश्न महत्वाचा ठरला असून त्यांच्या भूमिकेवर सेनेच्या गोटातून कोणती प्रतिक्रिया उमटती याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.