युतीची पहिल्या फेरीत अदलाबदलीवर चर्चा

mahayuti
मुंबई- आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपांबाबत भाजप आणि शिवसेना या दोन पारंपारिक मित्र पक्षात आज चर्चा झाली. पहिल्या फेरीत प्रामुख्याने एकदिलाने व सामुहिक प्रयत्नाने महायुतीची सत्ता आणण्यासह महायुतीतील सर्व घटकांना सन्मानजनक जागा देण्याचे ठरले. याचबरोबर बदलत्या राजकीय ताकदीनुसार काही जागांच्या अदलाबदलावर चर्चा झाली.

आज मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेची पहिली बैठक सुमारे दोन तास ही बैठक चालली. या बैठकीला भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे- पालवे, एकनाथ खडसे उपस्थित होते. तर, सेनेकडून सुभाष देसाई, रामदास कदम, गजानन किर्तीकरांसह लीलाधर डाके उपस्थित होते.

या बैठकीसंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने निम्म्या जागांचा हट्ट सोडून 135 पर्यंत मागणी केली आहे. राज्यात भाजपचा मोठा भाऊ शिवसेनाच राहील हे भाजप नेत्यांनी मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाची संधी शिवसेनेलाच सर्वाधिक राहील असे भाजप नेत्यांनी खासगीत मान्य केले आहे. त्यामुळे भाजप इतर राज्यांप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही. याचबरोबर मुंबईतील विलेपार्ले, मंबादेवी, भिवंडी, पालघर, पुण्यातील कोथरूड, सांगलीतील तासगाव, कोकणातील गुहागर, धुळे शहर आणि अचलपूर आदी भाजपची मोठी ताकद असलेल्या जागांची मागणी केली आहे. याचबरोबर विदर्भातील काही जागांचा समावेश आहे. मात्र, काही अदलाबदल करू पण आम्हाला हव्या त्या जागा सोडाव्या लागतील अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यावर भाजपने होकार अथवा नकार दिला नाही.

Leave a Comment