भारताला मिळणार 18 अब्ज डॉलरचे कर्ज

world-bank
नवी दिल्ली : आगामी तीन वर्षात भारताला 15 ते 18 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे आश्वासन जागतिक बँकेने दिले असून हे अर्थबळ भारताच्या आर्थिक वाढीचा दर 9 टक्के करण्यासाठी बँकेद्वारे पुरविले जाणार आहे.

जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी सांगितले की, ‘आम्ही कर्जाशी संबंधित विशिष्ट प्रकरणांवर चर्चा केली नाही. भारताला आगामी तीन वर्षात आम्ही शासकीय योजनांसाठी 15 ते 18 अब्ज डॉलरचे कर्ज देणार आहोत. खासगी प्रकल्पांसाठीही कमीत कमी 3.5 अब्ज डॉलर उपलब्ध करून दिले जातील.’ बँक समूहाचा सदस्य आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ अर्थात आयएफसीद्वारे विकसनशील देशांत खासगी क्षेत्रतील उपक्रम व प्रकल्पांसाठी कर्ज व सल्ला दिला जातो.

भारत जागतिक बँक समूहाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताला 5.2 अब्ज डॉलर एवढे कर्ज मिळाले होते. जागतिक बँक समूहाकडून गेल्या तीन वर्षात प्राप्त झालेल्या कर्जाचा आकडा 9.8 अब्ज डॉलरवर जातो.

नव्या सरकारचे विकासविषयक प्राधान्यक्रम जाणून घेण्याकरता जिम योंग किम हे तीन दिवसांच्या भारत दौ:यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी झालेल्या भेटीत देशाच्या वाढीला कशी चालना देता येईल व लोकसंख्या व्यवस्थापनावर चर्चा झाली.

Leave a Comment