जागतिक बँक भारताला देणार १८ अब्जांचे कर्ज

worldbank
दिल्ली – पुढील तीन वर्षात जागतिक बँक समूह भारताला १५ ते १८ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास तयार असल्याचे वर्ल्ड बँक ग्रुप अध्यक्ष जिम योंग किम यांनी दिल्लीत सांगितले. ते तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले असून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली आहे.

किम म्हणाले की मोदी सरकारने देशासाठी ज्या योजना प्रामुख्याने हाती घेतल्या आहेत त्यामुळे देशाचा आर्थिक विकास दर ९ टक्कयांवर पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रासाठी १५ ते १८ अब्ज डॉलर्सचे तर खासगी विभागासाठी वर्ल्ड बँकेच्या इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन तर्फे ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज भारताला पुरविले जाईल. इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन विकसनशील देशातील खासगी क्षेत्रांना सल्ला आणि प्रकल्प विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे.

वर्ल्ड बँक ग्रुपचा भारत सर्वात मोठा क्लायंट असून गतवर्षी भारताने ५.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळविले आहे. गेल्या तीन वर्षात देशाने ९.८ अब्ज डॉलर्स कर्जरूपाने घेतले आहेत. नवीन सरकारचा आर्थिक विकास दर वाढविण्याचा ठाम निर्धार असून त्यामुळे गरीबी दूर होण्यास मदत होणार आहे असेही किम यांनी सांगितले.

Leave a Comment