रियल माद्रिदशी करारबद्ध झाला जेम्स रॉड्रिग्यूज

james
माद्रिद – 23 वर्षीय जेम्स रॉड्रिग्यूजने क्लब स्तरावर रियल माद्रिद संघाशी 6 वर्षांचा करार संमत केला. रॉड्रिग्यूज अलीकडेच संपन्न झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये कोलंबियाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारुन देण्यात सिंहाचा वाटा उचलुन सर्वाधिक 6 गोलसह गोल्डन बूट पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

रॉड्रिग्यूजने करारावर सॅनिटास क्लिनिकमध्ये वैद्यकीय चाचणी पार केल्यानंतर स्वाक्षरी केली. सॅन्टिगो बर्नाब्यू स्टेडियमबाहेर त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यालाही रॉड्रिग्यूजने अभिवादन केले. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेन्टिनो पेरेझ यांनी फॉरवर्ड खेळाडू असलेल्या रॉड्रिग्यूजचे स्वागत केले. शिवाय, जेम्स अशी अक्षरे असलेली जर्सी त्याला प्रदान केली. त्यांनी जेम्स या शब्दाच्या स्पॅनिश स्टाईलमध्ये हामेस असा उच्चारही केला. `माद्रिदसाठी मला अनेक टायटल्स जिंकून द्यायची आहेत. त्या मोहिमेचा लवकरच प्रारंभ होईल’, अशी प्रतिक्रिया रॉड्रिग्यूजने यावेळी नोंदवली.

आता दि. 1 ऑगस्ट रोजी रॉड्रिग्यूज संघात दाखल होईल, असे संकेत आहेत. रॉड्रिग्यूजने यंदा वर्ल्डकपच्या दुसऱया फेरीत उरुग्वेविरुद्ध चेंडू छातीवर घेत तो जमिनीवर आदळण्यापूर्वीच गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेतला. तो गोल स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणून नोंदवला गेला होता. त्याची दखल घेत माद्रिदने या स्टार खेळाडूला करारबद्ध केले.

Leave a Comment